आरोग्यमंत्र्यांनीच केला रुग्णवाहिकेतून प्रवास

Foto
 रुग्णांची व्यथा जाणून घेण्यासाठी मंत्री थेट रुग्णवाहिकेत, रुग्णवाहिकेची पाहणी करत घेतला प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव

छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित आरोग्य संवाद यात्रेदरम्यान रुग्णवाहिका सेवेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी स्वतः रुग्णवाहिकेतून प्रवास केला. रुग्णांना वेळेत आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच रुग्णवाहिका सेवेतील अडचणी व सुविधांची प्रत्यक्ष माहिती जाणून घेता यावी, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णवाहिकेची सविस्तर पाहणी करून त्यातील ऑक्सिजन सुविधा, स्ट्रेचर, प्रथमोपचार किट, औषधे आणि अन्य वैद्यकीय उपकरणांची माहिती घेतली. त्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत आरोग्यमंत्री महोदयांसोबत लासूर स्टेशन ते प्राथमिक आरोग्य केंद्र लासूर असा प्रवास केला.

प्रवासादरम्यान आरोग्यमंत्र्यांनी रुग्णवाहिका चालक आणि आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधला. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचविताना येणाऱ्या अडचणी, रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यातील समस्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत अधिक तत्पर सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. 
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, रुग्णासाठी रुग्णवाहिका म्हणजे धावते रुग्णालय असते. अपघात किंवा हृदयविकाराच्या रुग्णासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. रुग्णवाहिका वेळेत पोहोचली, तर अनेकांचे प्राण वाचतात. म्हणूनच रुग्णवाहिकेतील सुविधा कशा आहेत, हे मी स्वतः पाहण्यासाठी आज प्रवास केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम व वेगवान करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 

-- भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव
यांच्या संकल्पनेतून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध -- 

रुग्णांना वेळेत आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या सामाजिक उद्देशातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी आणि वेळेत रुग्णालयात पोहोचता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार प्रशांत बंब, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-- रुग्णवाहिका सेवेबाबत महत्त्वाची माहिती -- 

 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा २४ तास, सातही दिवस मोफत उपलब्ध आहे. माता, नवजात शिशू आणि इतर गंभीर रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे.  गरोदर मातांना रुग्णालयात नेणे तसेच प्रसूतीनंतर घरी सोडण्याची सुविधा मोफत उपलब्ध आहे. अपघात, हृदयविकार, प्रसूती यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेमार्फत तातडीची मदत दिली जाते.